तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’गटाचे २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तावित केले आहे. यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हा प्रस्ताव म्हणजे राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे चक्रव्यूह आहे, अशी टीका केली आहे.
बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी मंगळवारी खर्गे यांचे नाव इंडिया गटाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रस्तावित केले. ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान होऊ शकतात, असे यावेळी नमूद करण्यात आले. मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. एमडीएमके पक्षाचे वायको यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र स्वतः खर्गे यांनी सर्वांत आधी जिंकणे आणि आघाडीची ताकद वाढवणे महत्त्वाचे असून बाकीचे नंतर ठरविले जाईल, असे सांगितल्याचे वायको यांनी स्पष्ट केले.
त्यावर ‘केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना माहीत आहे की, राहुल गांधी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत खरगे हे कधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकणार नाहीत. दोघांनीही राहुल गांधी यांना शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हे चक्रव्यूह रचले आहे. त्यांनी या चक्रव्युहात खर्गे आणि गांधी या दोघांनाही अडकवले आहे,’ असे सिंग यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र
इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!
ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या
मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही इंडिया गटाच्या बैठकीवर टीका केली. ‘देशाने प्रगती करू नये, यासाठीच ही बैठक घेतली जात आहे. इंडिया गटातील सर्व घटकपक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र मोदी यांचा पराभव करणे हा मुलांचा खेळ नाही,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आठवले यांनी इंडिया गटाचा समाचार घेतला.