जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!

जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणचा पाहणी दौरा करत होते. पण त्याचवेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे पीडित कोकणवासीयांवर अरेरावी करताना दिसले. भास्कर जाधव यांच्या अशा प्रकारच्या वर्तनावर समाज माध्यमातून सडकून टीका होताना दिसत आहे. त्यातच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अस्सल मालवणी भाषेत जाधव यांना चपराक लगावली गेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील पाहणी दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव हे त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरताना दिसले. पण यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडत टाहो फोडणाऱ्या नागरिकांना धीर द्यायचा सोडून जाधव त्यांच्यावर अरेरावी करताना दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे हे कुठेच जाधव ह्यांना समजुतीचे चार शब्द सांगताना दिसले नाहीत. त्यांनी एका महिलेला उडवाउडवीची उत्तरे दिली, तर एका महिलेवर चक्क हात उगारला. जाधव यांच्या अशा वर्तनासाठी त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात

मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी

आमदार खासदारांचा पगार इथे वळवा, पण आम्हाला मदत करा!

कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून जाधवांवर निशाणा साधण्यात आला आहे. अस्सल मालवणी भाषेत ट्विट करत भाजपाने जाधव यांच्यावर प्रहार केला आहे. “जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!” असे भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून भास्कर जाधव यांच्यावर हल्ला चढवला आहे. “कसला माज आलाय यांना? जनतेचे अश्रूही दिसत नाहीत. इथेही सत्तेची मस्ती बाजूला ठेवता येत नाही.” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांची लक्तरे टांगली आहेत.

भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही भास्कर जाधव यांना लक्ष्य केले आहे. भास्कर जाधव यांचा महिलेवर हात उगारण्याचा व्हिडीओ शेअर करताना “हा ‘पुरुषार्थ’ दाखवल्यामुळे धन्य झाले असतील मा.बाळासाहेब” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Exit mobile version