अरविंद सावंतांच्या स्मृतिभ्रंशावर भाजपाचा पलटवार

अरविंद सावंतांच्या स्मृतिभ्रंशावर भाजपाचा पलटवार

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पलटवार केला आहे. २५ वर्षांनंतर युतीत सडल्याचा साक्षात्कार झालेल्यांनी सव्वा वर्षाच्या गोष्टी करू नयेत असे म्हणत भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अरविंद सावंतांवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गमधील लाईफटाईम महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रात आले होते. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचेही शहा यांनी सांगितले. “मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो.” असेही शहा म्हणाले.

अमित शहा यांच्या भाषणावर टीका करतांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी “वाचन दिलं नव्हते हे सांगायला सव्वा वर्ष लागले.” अशी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. सावंतांच्या याच प्रतिक्रियेवरून भाजपाने त्यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. “शिवसेना गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेली तेव्हापासूनच अमित शहा यांनी शिवसेनेला भाजपाने कोणतेही वाचन दिले नसल्याचे सांगितले आहे. आजवर अनेक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही याचा खुलासा वारंवार झाला आहे आणि ज्यांना २५ वर्षांनंतर युतीत सडल्याचा साक्षात्कार होतो त्यांनी भाजपाला सव्वा वर्षांवरून बोलू नये.” असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. 

Exit mobile version