शिवसेनेचा प्रस्ताव भाजपाने फेटाळला
राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत आता रंगत आली असून सहाव्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चुरस असणार हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी तिसरा उमेदवार मागे घ्यावा असा प्रस्ताव ठेवला होता पण भाजपाने तो प्रस्ताव फेटाळला. उलट शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली पण शिवसेनाही दोन्ही जागा लढविण्यास उत्सुक आहे. त्यामुळे कुणीही मागे हटण्यास तयार नसल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर शिवसेना किंवा भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सहाव्या जागेसाठी या दोन पक्षांच्या उमेदवारांत चुरस असेल हे स्पष्ट झाले आहे. येत्या १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे.
त्याआधी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेत तुम्ही राज्यसभेचा एक उमेदवार मागे घ्या आणि आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला मदत करू अशी ऑफर दिली. पण भाजपाने तो प्रस्ताव फेटाळला.
राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, शिवसेनेचे अनिल देसाई व काँग्रेसचे सुनील केदार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तासभर ही चर्चा झाली.
हे ही वाचा:
‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे PFI शी साटेलोटे
म्हणून पाकिस्तान ऑनर किलिंगमध्ये अव्वल
यात चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमच्याकडे २४ मते आहेत. सहयोगींची ६ मते धरून एकूण ३० मते आहेत. फक्त ११-१२ मते आम्हाला कमी पडत आहेत. आमच्या मागील वेळेस जेवढ्या जागा होत्या तेवढ्या त्या मिळायला हव्यात. जर विधान परिषदेला मदत करू असे मविआचे नेते म्हणत असले पण त्यांनी शब्द फिरवला तर…त्यापेक्षा मविआने राज्यसभेत आम्हाला मदत करावी आणि आम्ही त्यांना विधान परिषद सोडतो.