वरळी बीडीडी चाळीतील आग दुघर्टनेत भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात नायर रुग्णालयाने केलेल्या दिरंगाईबाबतच्या चर्चेत शिवसेना आणि भाजप परस्परांना भिडले.
मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी भाजपच्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यावरून हा वाद पेटला आणि भाजपच्या या ११ नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर चाल करत त्यांना घेराव घातला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी १५ मिनिटांकरता सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेचे राजकारण करण्याचे काम स्थायी समिती अध्यक्षांनी पालिका सभागृहात केले, याचा आम्ही निषेध करतो व अध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी करतो. या असंवेदनशील लोकांना जनताच धडा शिकवेल. pic.twitter.com/g9GE7Suk5d
— Manoj Kotak (@manoj_kotak) December 3, 2021
काही लोक या प्रकरणाचा शोध घेण्याऐवजी पळ काढत आहेत, असे वक्तव्य यशवंत जाधव यांनी केल्यानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि राजीनामा दिलेल्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी त्यांच्या आसनाच्या दिशेने धाव घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी धाव घेतल्यामुळे मग शिवसेनेचेही नगरसेवकही प्रतिकार करण्यासाठी सरसावले. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यशवंत जाधव यांनी आपला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी करत भाजपने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. प्रकरण अगदी हमरीतुमरीवर आले होते. शेवटी ज्येष्ठ नगरसेवकांनी मधे पडत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली.
हे ही वाचा:
सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?
पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या
लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर; राहुल गांधींचा कोणता क्रमांक?
एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा
याप्रकरणी बोलतांना भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेची भूमिका बेताल असून गंभीर विषयावर चर्चा असताना यशवंत जाधव यांनी राजकारण केले, असे सांगितले. भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयाला दिलेली भेटही त्यांना झोंबल्याचे सांगत शिरसाट म्हणाले की, आरोग्य समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामे त्यांना आवडले नाहीत. त्यामुळे त्या रुग्णालयात भाजपचे कुणी फिरकले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यांचा निषेध करण्यासाठी सभागृह बंद पाडले.