त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपाचाच बोलबाला!

त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपाचाच बोलबाला!

त्रिपुरमधील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे. त्रिपुरा येथे होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप तेरा ठिकाणी आघाडीवर आहे. तर उर्वरित ७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे या १३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा जिंकली. तर त्रिपुरा मधील सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे.

त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतळा येथील नगरपालिकेमध्ये ५१ पैकी ४९ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर उर्वरित दोन जागांवर देखील भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्रिपुरा राज्यात एकूण २० स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३३४ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी ११२ जागांवर त्रिपुरातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित २२२ जागांपैकी बहुतांश जागांवर भारतीय जनता पार्टीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. यासाठी एकूण ७८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे ही वाचा:

… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक

दो साल, जनतेचे हाल

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’

आमबासा नगरपालिकेमध्ये १५ पैकी १२ जागांवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. तर उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार खोवाई, कुमारघाट, सब्रूम नगरपंचायत आणि अमरपुर नगरपंचायत या ठिकाणी विजय संपादन केला आहे.

त्रिपुरामध्ये पाय रोवू पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही फक्त सुरुवात आहे आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्रिपुरामध्ये काम करण्यास तयार आहोत असे म्हटले आहे.

दरम्यान या मत मोजणीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. त्रिपुराचा रक्तरंजित राजकीय इतिहास बघता ही खबरदारी घेण्यात येत आहे.

Exit mobile version