केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करत देशवासीयांना दिवाळीची भेट दिल्यानंतर भाजपाशासित राज्यांनीही हाच कित्ता पुढे गिरवला आहे. आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गोवा अशा विविध भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवर आकारला जाणार व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी दिवाळीची ही डबल सरकारी भेट ठरली आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट
शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?
घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आसाम सरकारने राज्याचा व्हॅट सात रुपयांनी कमी केला. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील गोवा सरकार सात रुपयांनी व्हॅट कमी करणार असल्याचे सांगितले. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब देब यांनी देखील अशाच प्रकारची घोषणा करत पेट्रोल डिझेल वरील व्हॅट सात रुपयांनी कमी करणार असल्याचे सांगितले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी राज्यात दोन रुपयांनी व्हॅट कमी करत असल्याचे जाहीर केले. तर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी देखील राज्यातील व्हॅट सात रुपयांनी कमी केला आहे. बिहार मध्ये सुद्धा पेट्रोल वरील व्हॅट १.३० रुपयांनी तर डिझेलवरील व्हॅट १.९० पैशांनी कमी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा राज्यातील व्हॅट सात रुपयांनी कमी करत असल्याचे जाहीर केले आहे. तर कर्नाटकमध्ये देखील ७ रूपयांनी व्हॅट कमी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोलचे दर झटक्यात कमी होताना दिसत आहेत. या निर्णयामुळे बिगर भाजपशासित राज्य सरकारांवर एक प्रकारचा दबाव निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेणार का? असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत. तर महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडल वरून देखील या संबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली आहे.
पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी केल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi यांचे धन्यवाद. आता तरी मुख्यमंत्री @OfficeofUT महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणार आहेत का?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 3, 2021