पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपाने राज्य विधानसभेच्या निवडणूका विविध टप्प्यात घ्याव्यात आणि मतदान केंद्रावर निमलष्करी दलाच्या जवानांची नेमणुक करण्यात यावी अशा दोन मागण्या केल्या.
आठपेक्षा अधिक सदस्य असलेल्या या शिष्टमंडळात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांनी मतदान केंद्रावरील तृणमूल काँग्रेसच्या वतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांऐवजी तिथे निमलष्करी दलाच्या जवानांची नेमणूक करण्याची मागणी केली.
“आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि एक मेमोरँडम सादर केला. आम्ही त्यांच्यापुढे तीन मागण्या सादर केल्या. एक तर बंगाल विधानसभेच्या निवडणूका टप्प्यांत व्हाव्यात आणि दुसरे म्हणजे मतदान केंद्रांवर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात यावेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रशासन कोणत्याही पक्षासाठी काम करणारे नसेल. सरकारतर्फे ताकदीचा सातत्याने गैरवापर करण्यात आल्याने हे प्रश्न भारतीय निवडणूक आयोगापुढे मांडले जाणे आवश्यक होते.” असे यादव यांनी निवडणूक आयोगाशी भेट झाल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
याबरोबरच भाजपाच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाकडे सीआरपीएफची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र लिहीण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडायला मदत होईल.
पश्चिम बंगालच्या २९४ विधानसभेच्या जागांवर निवडणूक लवकरच होणार आहे. तृणमुल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा कार्यकाळ ३० मे २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे.