शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातूनच थेट रेमडेसिवीर इंजेक्शन्स काळ्या बाजारात आल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा जर खरी ठरली तर हा प्रकार खूपच धक्कादायक असणार आहे. एकीकडे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना महापालिकेच्याच रुग्णालयातून इंजेक्शन्स काळ्या बाजारात आली असतील तर यातून ठाणे महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
महाराष्ट्रात कोविडचा विस्फोट झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील आरोग्यसुविधा अपुऱ्या पडत आहेत. ‘रेमडेसिवीर’ या कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा राज्यात जाणवत आहे. रेमडेसिवीरची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी. याच परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने काही दिवसांपूर्वी या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पण लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराच्या अनेक घटना समोर येत आहेत.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय
राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?
शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात
‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न
राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातही हा काळाबाजार होत असल्याची कुजबुज सुरु आहे आणि तो पण थेट महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमधूनच. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी ट्विट करत या विषयाला वाचा फोडली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून १६ रेमडेसिवीर इंजेक्शन्स काळ्या बाजारात विक्रीसाठी आल्याची चर्चा रंगली आहे, असे डावखरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून सत्य काय आहे ते महानगरपालिकेने जाहीर करावे. अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. या प्रकरणाची कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाही.
ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधून १६ रेमडेसीविर इंजेक्शन्स काळ्या बाजारात विक्रीसाठी आली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी करून महापालिका प्रशासनाने सत्य जाहीर करावे. @CMOMaharashtra @TMCaTweetAway @TOIMumbai pic.twitter.com/OjPTfqnbcB
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) April 14, 2021