भारतीय जनता पार्टीचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या सारख्या राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांची तालिबान सोबत तुलना करून बदनाम करणाऱ्या वक्तव्याचा विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले. रविवार, ५ सप्टेंबर रोजी राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन केले गेले.
प्रसिद्ध लेखक गीतकार जावेद अख्तर यांनी शनिवार, ४ सप्टेंबर रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदुत्ववादी संघटनांची तुलना दहशतवादी तालिबानशी केली होती. अख्तर यांच्या या प्रतिक्रियेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व बाजूनी निषेध नोंदवला जात असून त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक होते. त्यांनी शनिवारी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत जावेद अख्तर यांचा समाचार घेतला होता. ‘ज्या संघ परिवारावर जावेद अख्तर यांनी टीका केली त्याच विचारधारेचे लोक आज देश चालवत आहेत. जर ती तालिबानी विचारधारा असते आत्तापर्यंत जावेद अख्तर यांचे काय झाले असते? याचा त्यांनी विचार करायला हवा. जावेद अख्तर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून देशभरातील संघ परिवारातील करोडो कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे जोपर्यंत जावेद अख्तर माफी मागत नाहीत तोवर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा एकही चित्रपट या देशात आम्ही चालू देणार नाही.’ असा पवित्रा राम कदम यांनी घेतला आहे.
तर रविवार, ५ सप्टेंबर रोजी राम कदम यांनी या विषयात आंदोलन केले आहे. घाटकोपर येथील निवासस्थानाबाहेर कदम यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी जावेद अख्तर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘जावेद अख्तर माफी मांगो’ अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर जावेद अख्तर यांचे फुली मारलेले फोटोही झळकावण्यात आले.