भारतीय जनता पार्टीने अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलने राज्यातील विविध भागात केली. मुंबईतही अजित पवारांच्या विधानाचा निषेध करणारे अनोखे आंदोलन भाजपाने घेतले. धरणबहाद्दराला गोमुत्र पाजा आंदोलन घेऊन अजित पवार यांच्या पोस्टरवर गोमुत्र शिंपडण्यात आले.
मुंबईतील दादर येथे हे आंदोलन झाले. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणांनी दादरचा परिसर दुमदुमून गेला.
धर्मवीर संभाजीराजांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते. तसेच अजित पवार यांच्या पोस्टरवर गोमुत्र शिंपडण्यात आले. कार्यकर्त्यांनी सोबत गोमुत्राच्या बाटल्या आणल्या होत्या. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनीही यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
पुण्यातही अजित पवार यांच्या निषेधार्थ युवा मोर्चाने आंदोलन केले. अजित पवार हे औरंगजेबाकडून प्रेरणा घेत आहेत, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. औरंगजेब कसा हिंदुद्वेष्टा होता, हेदेखील यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
कंझावाला प्रकरणी तातडीने अहवाल सादर करा!
भिवंडीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लावणाऱ्यांना अटक
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
अमरावती, बारामतीतही अशी आंदोलने झाली. अजित पवार यांच्या फोटोला चपलांनी मारून निषेध नोंदविला गेला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले, त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते. त्यावरून रान पेटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर औरंगजेब हा क्रूर, हिंदुद्वेष्टा नव्हता असा शोधही लावला. त्यावरूनही चांगलीच टीका झाली.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अजित पवार यांचा निषेधही नोंदविण्यात आला.