सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक २०२३ ची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने चांगलाच जोर लावला आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान, भाजपचाही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. भाजपाने सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा प्रसिद्ध केल्या आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सोमवार, १ मे रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी इतर अनेक घोषणांसह महत्त्वाचे म्हणजे समान नागरी संहितेचे आश्वासनही देण्यात आली आहे. समान नागरी संहिता (UCC) म्हणजे – धर्म किंवा जातीची पर्वा न करता भारतातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा. अहवालानुसार, समान नागरी संहिता ज्या राज्यात लागू केला जाईल, त्या राज्यात विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा, जमीन आणि मालमत्तेचे वितरण या बाबतीत सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू होईल. कर्नाटकात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एका उच्चस्तरीय स्थापन केली जाणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
जाहीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. हे मोफत गॅस सिलिंडर उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावली सणानिमित्त दिले जातील. तसेच ‘पोषण’ योजना सुरू केली जाईल. याद्वारे प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि मासिक रेशन किटद्वारे पाच किलो ‘श्री अण्णा- सिरी’ धान्य दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे.
त्यासोबतच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील महिलांना पाच वर्षांसाठी १० हजार रुपयांची एफडी. जागतिक दर्जाच्या मानकांनुसार सरकारी शाळांचा दर्जा वाढवा यासाठी प्रयत्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी. कल्याण सर्किट, बनवासी सर्किट, परशुराम सर्किट, कावेरी सर्किट, गंगापुरा सर्किटसाठी २ हजार ५०० कोटी तसेच पाच लाखांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. त्यासोबच पाच किलो तांदूळ आणि पाच किलो भरड धान्य आणि शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.