‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

काँग्रेसने जाहीरनाम्यात केल्या आहेत अनेक घोषणा

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

‘तुमचा विजेचा वापर २०० युनिटपेक्षा कमी असेल तर १ जूनपासून वीजबिल भरू नका,’ असे आवाहन कर्नाटक भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांनी कर्नाटकच्या नागरिकांना केले आहे.

काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणूक जाहीरनम्यात २०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. याची त्यांनी आठवण करून दिली. म्हैसूरचे खासदार आणि भाजप नेते प्रताप सिम्हा यांनी कर्नाटकात सत्तेवर आल्यास प्रत्येक घराला मोफत वीज देण्याच्या काँग्रेसच्या वचनाचा दाखला दिला. जनतेचा वीजवापर २०० युनिटपेक्षा कमी असल्यास १ जूनपासून वीजबिल भरू नये, असे ते म्हणाले.

काँग्रेसने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात, प्रत्येक घराला २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने कर्नाटकमध्ये १३५ जागा जिंकून भाजपला सत्तेवरून खेचल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच, नव्या सरकारने लवकरच आपल्या सर्व हमींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. आता भाजपने नव्या सरकारला कोणत्याही अटींशिवाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे.

पुढील महिन्यापर्यंत मोफत वीज योजना लागू न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल. मोफत वीज योजना लागू करण्याच्या मागणीसाठी म्हैसूर-कोडागू भागात आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी केली. वापर जास्त असेल तर पहिली २०० युनिट मोफत मानली जावी आणि केवळ फरकाची रक्कम द्यावी, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

असा असेल संसद भवन उदघाटन कार्यक्रम; पूजा, सेंगोल प्रतिष्ठापना, पंतप्रधानांचे संबोधन

इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

संसदभवन उद्घाटनावर बहिष्कार हे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक

मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले

“१ जूनपासून तुम्ही २०० युनिटपेक्षा कमी वीज वापरल्यास कृपया बिल भरू नका. सिद्धरामय्या यांनी ही वीज त्यांना स्वत:साठीही मोफत आहे, असे सांगितले होते. ते गरीब नाहीत. त्यामुळे ही वीज सर्वांसाठी मोफत आहे. तेव्हा कोणीही बिल भरू नका. यासाठी १ जूनपासून मी म्हैसूर आणि कोडागु भागात आंदोलन सुरू करेन,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Exit mobile version