पंतप्रधानांच्या उपस्थितीत पाच राज्यातील निवडणुकांची चर्चा

पंतप्रधानांच्या उपस्थितीत पाच राज्यातील निवडणुकांची चर्चा

पाच राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. याबाबत भाजपाच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट देखील करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर कोरोना महामारीत ज्यांना आपला जीव गमवावा लागला अशा सर्वांना श्रद्धांजली वाहून बैठकीच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.

या बैठकीतून महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपा राष्ट्रीय महासचिव अरूण सिंग यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. यात आत्मनिर्भर भारत, कृषी कायदे आणि पाच राज्यांत येऊ घातलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली जाऊ शकते.

या बैठकीत भाजपाच्या काही प्रदेश अध्यक्षांनी देखील हजेरी लावली आहे. कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

येत्या काही काळातच पाच राज्यात निवडणुका होणार आहेत. यापैकी पश्चिम बंगाल राज्यातील निवडणुकांकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यासाठी भाजपाने तयारी करायला देखील सुरूवात केली आहे. स्थानिक पातळीवरील महत्त्वाची निवडणुक म्हणून पश्चिम बंगालच्या निवडणुकीला महत्त्व आहे.

मागील वर्षी जे पी नड्डा यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे प्रत्यक्ष बैठक घेणे शक्य झाले नव्हते.

Exit mobile version