महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या राज्यसभा सदस्यांसाठी भाजपाकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पियुष गोयल हे याआधीही भाजपाकडून राज्यसभा सदस्य होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत होता. मात्र असे असले तरीही केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात होती. त्यामुळे भाजपा कडून दुसरा उमेदवार कोण दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर या गुपीतवरचा पडदा उठवत अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना शेतकऱ्यांचा चेहरा आणि ओबीसीचा चेहरा म्हणून ओळखले जाते. फडणवीस सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे कृषिमंत्रीसुद्धा होते. बोंडे हे भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून ओळखले जाते. अमरावती दंगलीच्या वेळी रझा अकादमीसारख्या संघटनांविरोधात हिंदूंसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी ओबीसी समाजासाठी देखील काम केले आहे, म्हणून त्यांना ओबीसीचा चेहरा म्हणून देखील ओळखतात.
हे ही वाचा:
पंजाबचे गायक सिद्धू मूसवाला याची हत्या
देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
पीयूष वेदप्रकाश गोयल हे केंद्र सरकारचे कॅबिनेट मंत्री असून ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. दरम्यान, भाजपाने हे दोन उमेदवार दिले असले तरी तिसऱ्या जागेसाठी भाजपा उमेदवार देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र अजूनतरी भाजपाने तिसऱ्या जागेसाठी उमेदवार दिलेला नाही.