भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दिल्लीत होत आहे. यंदाच्या ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे . जनतेच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि भावनिकदृष्ट्याही जोडणाऱ्या मुद्द्यांवर भाजपचे लक्ष असेल. मुस्लिम महिलांच्या सामाजिक सुरक्षेबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३५ केंद्रीय मंत्री, १२ राज्यांचे मुख्यमंत्री, ३७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील अध्यक्ष सहभागी होणार आहेत.
भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी सांगितले कि दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या या बैठकीच्या आधी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या कार्यकारिणीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. बैठकीची सुरुवात भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाषणाने होईल तर समारोप पंतप्रधानांच्या भाषणाने होणार आहे.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पटेल चौक ते सभास्थळ एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर दरम्यान भव्य रोड शो करणार आहेत. एक किमीच्या रोड शोमध्ये विविध राज्यातील कलाकार त्यांचे स्वागत करतील. रस्त्याच्या कडेला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर स्वतंत्र चर्चा होणार आहे. या वर्षी त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव
पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढवण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडला जाणार आहे. त्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळणार असून, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मुदतवाढ मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.