आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूका घेऊ नयेत असे मत मांडणार्या काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर मुंबई भारतीय जनता पार्टीने निशाणा साधला आहे. ‘यांना समाज बांधवांची काळजी आहे की पराभवाची भीती?’ असा सवाल मुंबई भाजपतर्फे विचारण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयातर्फे महाराष्ट्रातील आरक्षणाच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आले. सुरुवातीला न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आले आरक्षण हे घटनाबाह्य ठरवले. तर त्यानंतर ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधले आरक्षण हे रद्दबादल ठरवले. या दोन्ही निर्णयानंतर महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये अस्वस्थता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले आणि त्यामुळेच ही आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
हे ही वाचा:
मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी
मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल
तुम्हीच आमचे माय बाप…अजूनही जनतेला फडणवीसांकडूनच अपेक्षा
आल्या दिवशी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांकडून विविध प्रकारची मते मांडण्यात येत आहेत. त्यातच काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत असे मत व्यक्त केले आहे. वडेट्टीवार यांच्या याच मताला घेऊन भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून वडेट्टीवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. “आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नये, असा सल्ला मंत्री विजय वडेट्टीवार देताहेत. नक्की यांना समाजबांधवांची काळजी की, पराभवाची भीती?” असा सवाल मुंबई भाजपातर्फे उपस्थित केला गेला आहे.
आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नये, असा सल्ला मंत्री @VijayWadettiwar देताहेत. नक्की या समाजबांधवांची काळजी की, पराभवाची भीती?#MahaVasooliAaghadi pic.twitter.com/Ylfv7scga7
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 1, 2021