‘ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत पक्षबाजीचे राजकारण सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून लसीकरणाच्या बाबतीत पक्षपात केला जात आहे’ असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले जात असून, ‘देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची उठबस’ अशी स्थिती असल्याचा टोला सहस्रबुद्धे यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपातर्फे देशभर सेवा सप्ताह राबवला जात आहे. या सप्ताहाच्या अंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबिर घेण्यात येणार होते. मात्र शिवसेना शासित ठाणे महापालिकेने त्याला नकार दिला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाच्या पक्षपाती निर्णयावर सडकून टीका केली आहे. या वेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!
तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी
लसीकरणात भारताची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे
देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळाली पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या एक-दीड महिन्यांपासून ठाण्यात राजकीय दबावापोटी महापालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाव दिला जात आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिलकूल नाही. ती भारत सरकारची आहे. मात्र, ठाण्यात राजकीय पक्षबाजीसाठी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांना लसीकरणाची शिबिरे भरवायला दिली जातात. एखाद्या आपत्तीत नागरीकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. तर राजकीय पक्षबाजीमुळे सामान्य नागरीकांनि लसीपासून वंचित ठेवणे, हे देखील एक मोठे पाप आहे. हे पाप महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे असा आरोप विनय सहस्रबुद्धे यांनी केला.
भाजपाने कायमच ठाणे महापालिकेला सहकार्य केले आहे. त्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पण महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये. अन्यथा, गंभीर परिणाम होतील, असा इशाराही खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिला आहे.