भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर मुंबईचे लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेट्टी यांच्या सोबतच भाजपाच्या इतर कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्यामुळे शेट्टी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भाजपाचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची खासदार गोपाळ शेट्टी यांची इच्छा होती, पण त्यासाठी ठाकरे सरकारकडून परवानगी दिली जात नव्हती. तेव्हा गोपाळ शेट्टी यांनी २८ डिसेंबर पर्यंत परवानगी द्यावी अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार
वर्षा गायकवाड़ कोरोना पॉझिटीव्ह
काँग्रेस स्थापनादिनी पक्षध्वज खाली कोसळला आणि…
त्यानुसार मंगळवार, २८ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला परवानगी न मिळाल्याने गोपाळ शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. ठाकरे सरकारमधील मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानासमोर गोपाळ शेट्टी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनासाठीच खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात देखील गोपाळ शेट्टी यांना ताब्यात घेतल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. तर शेट्टी यांना सोडून देण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. “श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या पुतळा परवानगीसंदर्भात मंत्र्यांना भेटायला जात असताना खा.गोपाळ शेट्टी यांना अटक करण्यात आली. त्यांची सुटका करावी आणि यासंदर्भात तत्काळ एक बैठक बोलवून हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा!” असे फडणवीसांनी म्हटले आहे.
श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या पुतळा परवानगीसंदर्भात मंत्र्यांना भेटायला जात असताना खा.गोपाळ शेट्टी यांना अटक करण्यात आली. त्यांची सुटका करावी आणि यासंदर्भात तत्काळ एक बैठक बोलवून हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा!
(विधानसभा,28डिसेंबर2021)#atalji #ataljiamarrahen pic.twitter.com/2qlFPJsDUK— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 28, 2021