भाजपाचे आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज, २२ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने पुण्यामध्ये शोकाकुल पसरली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील गॅलेक्सी केअर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात आज दुपारी साडे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ९ ते ११ वाजता केसरी वाडा येथे राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. २०१७ ते २०१९ साली त्या पुण्याच्या महापौर होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपाच्या आमदार होत्या. त्यांनी पुण्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते.
विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजारी असताना देखील मुक्ता टिळक यांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील आपला हक्क बजावला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले होते.
हे ही वाचा :
२२ डिसेंबर राष्ट्रीय गणितज्ञ दिवस
लग्नासाठी मुलगी द्या, म्हणत सोलापुरात तरुणांचे आंदोलन
दिशा सालियन प्रकरण जाणार एसआयटी अर्थात विशेष तपास समितीकडे
आफताब म्हणाला मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही
मुक्ता टिळक यांनी मानसशास्त्र विषयातून एमए तसेच एमबीएचे शिक्षण त्यांनी घेतले होते. २००२ साली त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी उत्तम कामं केली आहेत. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहून भाजपाने त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.