भाजपा नेते आमदार ऍड.आशिष शेलार यांची माहिती
राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार शेलार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
पुरग्रस्त वाऱ्यावर, सरकार खूर्ची बचाव कार्यात व्यस्त
लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला
अबब!! २१ वर्षांत २१ हजार कोटी खड्ड्यांत?
भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट
त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांंचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी ही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
याआधी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, भाजपाच्या युवा मोर्चातर्फे कोकणातील पूरग्रस्तांसाठी अन्नपदार्थ, कपडे व जीवनावश्यक वस्तुंची मदतही पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे मदतीचे ट्रक कोकणाकडे रवान झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चिपळूणच्या दौऱ्यादरम्यान व्यापाऱ्यांनी त्यांना घेराव घातला होता आणि आपल्या मागण्या ठेवल्या तसेच एका महिलेने आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणाकडे वळवा, अशी आर्त मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची बरीच चर्चाही झाली होती.