भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतले, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवेदन लगेच बाहेर आले. पण मालेगाव, नांदेड, अमरावतीत घटना घडली तेव्हा एकही निवेदन केले नाही. शिवसेनेने काँग्रेसकडून झालेला सावरकरांचा अपमान सत्तेसाठी सहन केला. म्हणजेच तुम्ही हिंदू समाज सोडला असेल, तुम्ही हिंदुत्व सोडले असेल, पण या हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी भाजपा सक्षम आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मालेगाव, अमरावती, नांदेड येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात भाजपाने धरणे आंदोलन केले आहे. त्यातच आमदार भातखळकर यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, २०१२मध्ये रझा अकादमीने मुंबईत झालेल्या मोर्चात अमर जवान ज्योतीची तोडफोड केली होती, महिला पोलिसांचा विनयभंग केला. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जे इतिहास विसरले आहेत ती शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला मी सांगू इच्छितो की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हिंदुंवरील अत्याचार सहन करणार नाही. महाराष्ट्रानेच औरंगजेबाला गाडले होते. त्यामुळे १२ कोटी जनतेचा होत असलेला छळ बंद करा. या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी न्यायाधीशांमार्फत व्हावी आणि रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी.
भातखळकरांनी म्हटले की, १२ नोव्हेंबरला निदर्शने केली गेली. मोर्चे निघाले. कशाला केले गेले होते हे मोर्चे. त्रिपुरात एक महिना आधी मशीद पाडल्याचा अहवाल पाठवला गेला. दोन पत्रकारांनी तो लिहिला होता. जे नेहमी मोदींविरोधात, भाजपाविरोधात लिहितात त्यांनी हा अहवाल दिला. पुढच्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते जळलेले कागद दाखवून ते कुराण असल्याचे दाखविण्यात आल्याची कबुली या पत्रकारांनी दिली. घटना इथेच थांबली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले, त्रिपुरात आमच्या मुस्लिम बांधवांवर अत्याचार, अन्याय होत आहेत असे ट्विट केले. राहुल गांधींकडे कोणते पुरावे होते. त्यामुळे हे षडयंत्र आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मॉडेलला ते उत्तर देऊ शकत नाहीत, अडथळा आणू शकत नाहीत.
भातखळकर यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत अल्पसंख्यांकाना एकत्र आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्याचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. हे काम महाविकास आघाडीने केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी अल्पसंख्यांकाच्या लांगुलचालन करण्याचे हे प्रयत्न केले. त्याचा प्रयोग १२ नोव्हेंबरला दिसला. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी रझा अकादमीला परवानगी का दिली याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. त्याची पूर्वतयारी आधीपासूनच होत होती. पोलिसांचे सायबर डिपार्टमेंट त्यावेळी झोपले होते का? शरद पवार यांनी रामजन्मभूमी कार्यक्रमाआधी सांगितले, की त्यामुळे कोरोना जाणार आहे. तुम्ही आजारातून बाहेर आल्यावर दारुवाल्याचे कर माफ करा म्हणून सांगितले. केंद्राने पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. पण या महावसुली सरकारने ५० टक्के भाव कुठे कमी केले तर स्कॉचमध्ये. विदेशी मद्य फार महाग आहे म्हणे.
हे ही वाचा:
शिवचरित्र हा श्वास, राष्ट्रनिर्मितीचा ध्यास
अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन
‘तपास सीबीआयकडे दिल्यास परमबीर हजर होतील’
नांदेडमध्ये रझा अकादमीने मोर्चा काढला. पोलिस जखमी झाले पण त्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? मी माहिती घेतली तेव्हा १२ तारखेचे जे मोर्चे काढले त्यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश गृहमंत्रालयातूनच होते. रझा अकादमीवर कारवाई करायची नाही, असेही आदेश होते. महाराष्ट्रात म्हणूनच आम्ही धरणे धरले आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. अर्थात, त्यामुळे फायदा होईल अशी शक्यता नाही, असेही भातखळकर म्हणाले.