शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्स माफियांवरून ओवाळून टाकली की काय, असा खरमरीत सवाल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला विचारला आहे.
लागोपाठ केलेल्या ट्विटमधून त्यांनी शिवसेना, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार केला आहे.
‘सामनाचा अग्रलेख वाचून याला बाबरनामा का म्हणू नये असा प्रश्न मला पडला आहे. माफियांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एका प्रामाणिक मराठी अधिकाऱ्यांच्या विरोधात ही गरळ कुणासाठी? ठाकरे सरकारचा एक मंत्री ड्रग्स माफियांची सुपारी घेतो आणि शिवसेना त्याचे निर्लज्ज समर्थन करते, तीही एका मराठी अधिकाऱ्याच्या. इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसुली केली?’, असा सवालही आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य केले आहे. त्यावरून आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, ‘एका मराठी अधिकाऱ्याविरुद्ध शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले तिघाडी सरकार आकाश पाताळ एक करत आहे. ड्रग्स माफियांच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल त्याला धडा शिकविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरसावले आहेत. ड्रग्स माफियांच्या तालावर ठाकरे सरकार नाचते आहे.’
भातखळकर लिहितात की, ‘केंद्र सरकार ठाकरे सरकारच्या वाटमारीवर पांघरुण घालेल, अशी अजिबात अपेक्षा करू नका. केलेली वाटमारी घशात हात घालून सरकारी तिजोरीत जमा केली जाईल. सामनातून कितीही ठणाणा केलात तरी. ड्रग्समाफियांकडून वसुली करणारा वाझे कोण?’
हे ही वाचा:
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?
प्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र?
मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला तुरुंगवास झाल्यामुळेच ते खवळले आहेत. यावर आमदार भातखळकर म्हणतात की, ‘गांजाच्या व्यवहारात नवाब मलिक यांचे जावई सापडले हा दोष एनसीबी आणि वानखेडेंचा कसा? तुम्ही पोलिसांना खंडण्या वसूल करायला लावलेत. केंद्रीय यंत्रणांनी ड्रग्स माफियांवर कारवाई न करता तुमच्यासारखी वाटमारी करावी अशी शिवसेनेची अपेक्षा आहे काय?’