भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला समाचार
दुसऱ्याच्या घरात?… अहो, आव्हाड कोकण महाराष्ट्रात आहे. ते दुसऱ्याचे घर नाही. राज्याचाच भाग आहे. बोलताना तारतम्य तरी बाळगा. मंत्री आहात. मंत्रालयातला शिपाईसुद्धा अशी चूक करणार नाही, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
आव्हाड यांनी २७ जुलैच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ आणि निर्माण झालेली परिस्थिती यामुळे २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची लवकरच घोषणा केली जाईल. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद मनवावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
आव्हाड यांच्या या ट्विटवर आमदार भातखळकर यांनी खरमरीत टीका केली आहे.
२७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते, पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.
दुसऱ्याच्या घरात….? अहो आव्हाड कोकण महाराष्ट्रात आहे. ते दुसऱ्याचे घर नाही, राज्याचा भाग आहे. बोलताना तारतम्य तरी बाळगा, मंत्री आहात. मंत्रालयातला शिपाई सुद्धा अशी चूक करणार नाही… pic.twitter.com/GVM63Jh038
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 26, 2021
कोकणात पावसामुळे जो हाहा:कार माजला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फारसे गांभीर्य नसल्याची टीका होत आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली तेव्हा सोबत असलेले आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वर्तणुकीवर अवघ्या महाराष्ट्रातून सडकून टीका झाली. मुख्यमंत्र्यांनीही धावता दौरा केल्यामुळे त्याबद्दलही लोकांनी नाराजी प्रकट केली. आता याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.