बेस्ट विकासकांवर मेहेरबान, कर्मचाऱ्यांना मात्र दुजाभाव

बेस्ट विकासकांवर मेहेरबान, कर्मचाऱ्यांना मात्र दुजाभाव

मराठी माणसाच्या हितासाठी सत्तेवर आल्याचे सातत्याने सांगणाऱ्या सरकारने बेस्ट प्रशासनातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटीचे पैसे मात्र अजूनही थकवलेले आहेत. त्याबरोबरच बेस्टच्या आगारांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या विकासकांकडून पैसे येणे शिल्लक आहे. ही थकबाकी देखील वसूल केली जावी अशी जोरदार मागणी भाजपाचे नेेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

हे ही वाचा:

चीनने केला मुंबईच्या ‘पॉवर ग्रीड’ वर हल्ला?

या बाबत बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी माहिती दिली की, २००७ मध्ये सुमारे सात बस आगार विकासकांना वापरायला देण्यात आले होते. त्यांच्याकडून सुमारे ₹२५० कोटी येणे बाकी आहे. त्याचवेळेला सुमारे ३५०० निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देखील बाकी आहे, जी सुमारे ₹४५० कोटी आहे. त्यामुळे जोपर्यंत हे बडे विकासक त्यांची थकबाकी देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मुंबई शहरातल्या इतर कामांवर स्टे लावण्यात यावा, आणि त्यांच्याकडून येणाऱ्या पैशातून मराठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटिचे पैसे देण्यात यावेत.

आमदार अतुल भातखळकर यांनी ही मागणी सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दोघांकडे केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे स्टे आणणे शक्य नसल्याचे सांगितले, तर मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रश्नावर मिठाची गुळणी धरली असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

कालपासून महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले आहे. विविध विषयांवरून विरोधी पक्ष सरकारला चांगलेच घेरत आहेत.

Exit mobile version