नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला.
गुरुवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णसेवेत अक्षम्य हेळसांड, दुर्लक्ष व गोल्डन आवरमध्ये विलंब झाल्याचे मान्य केले. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने मृत बालकाच्या नातेवाईकांना रुपये पंचवीस लाख नुकसानभरपाई द्यावी आणि सदर घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.
पेंग्विनवर उधळपट्टी; जनता वाऱ्यावर
मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी ४५०० कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही नायर रुग्णालया प्रशासन / डॉक्टरांचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या ४५ मिनिटांत डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे एका दुर्दैवी चिमुकल्याचा अंत होणे ही अतिशय शरमेची बाब आहे. एकीकडे केवळ युवराजांच्या हट्टापायी भारतीय प्राणी, पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज रु.१.५ लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही ही बाब तमाम मुंबईकरांसाठी दुर्दैवी असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
सावरकर हे पर्मनंट भारतरत्न…त्यांचा अपमान करू नका!
पेन्टोग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने पश्चिम रेल्वे रखडली
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले जीवन
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही फिरकलेसुद्धा नाहीत; साधी दखलही घेतली नाही. मुर्दाड प्रशासनाचे व सत्ताधार्यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
आरोग्य समितीतील ज्या भाजपा नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे त्यात बिंदू त्रिवेदी, हर्षिता नार्वेकर, सारिका पवार, बिना दोषी, प्रियांका मोरे, निल सोमैया, अनिता पांचाळ, सुनीता मेहता, प्रकाश मोरे, योगिता कोळी, राजुल देसाई यांचा समावेश आहे.