उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत ‘लोक कल्याण संकल्प पत्र’चे प्रकाशन करण्यात आले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत.
भाजपच्या लोककल्याण संकल्प पत्रात भाजपने शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी मोठी आश्वासने दिली आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आमच्या सरकारने पाच वर्षांपूर्वी जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. राज्यातील दंगली आमच्या सरकारने आता संपुष्टात आणल्या आहेत. मुली निर्भयपणे घराबाहेर पडतात. एक काळ असा होता की मुलींना घराबाहेर पडण्याची भीती वाटत होती, असेही योगी म्हणाले.
भाजपने आपल्या लोककल्याण संकल्प पत्रात म्हटले आहे की, पुन्हा आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना पाच वर्षे सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. याशिवाय कृषी सिंचन योजना सुरू करण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
भाजपने महिलांना दिलेल्या वचनात म्हटले आहे की, सत्तेत आल्यास मुख्यमंत्री सुमंगला योजनेंतर्गत दिली जाणारी मदत वाढवली जाईल. या योजनेंतर्गत मदतनिधी १५ हजारांवरून २५ हजार करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय दिवाळी आणि होळीच्या दिवशी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच साठ वर्षांच्या महिलांनाही मोफत पास देण्याचे आश्वासन दिले आहे. तरुणांना लॅपटॉप, टॅबलेट देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपने तरुणांना स्वयंरोजगारासाठी अनेक आश्वासने दिली आहेत.