२०२२ मध्ये होऊ घातलेल्या आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रात सत्तेत असणार्या भारतीय जनता पक्षाने पंजाब निवडणुकांसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक कांग्रेस पार्टी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षासोबत युती जाहीर केली आहे. शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ति मंत्री आणि पंजाब निवडणुकांसाठीचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही घोषणा केली आहे
काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून पंजाबचा कारभार पाहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकल्या पासूनच अमरिंदर सिंग आणि भाजपा युतीची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदावरून अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये जाणार असल्याची किंवा नवीन पक्ष काढून भाजपासोबत युती करणार असल्याची चर्चा रंगली होती.
हे ही वाचा:
विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला
चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या
केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश
टाटांचा महिलांसाठी ‘हा’ अभिमानास्पद निर्णय
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या युतीचा मार्ग अधिक सुकर झाला होता. तर सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मोदी सरकारने रद्द केल्यामुळे वाटाघाटी पुढे सरकून युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गजेंद्र शेखावत यांनी चंदीगड येथे अमरिंदर सिंग यांची भेट घेऊन युती संदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. याबद्दल अमरिंदर सिंग यांनी असे म्हटले आहे की, “आम्ही गेल्या काही काळापासून भारतीय जनता पार्टीसोबत युतीसाठी चर्चा करत असून आज त्याची अधिकृत घोषणा झाली आहे. आम्हला १०१ टक्के खात्री आहे की आम्ही सत्तेत येऊ. आमची काँग्रेस, अकाली दल अथवा आम आदमी पक्षासोबत कोणतीही स्पर्धा नाही.” या युतीत जागावाटप नेमके कशा प्रकारे असेल हे पुढील काही दिवसातच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.