ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघडीच्या एक नाही तर दोन दोन मंत्र्यांना धक्का लागला आहे. बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली आहे. २१ जागांपैकी १८ जागा जिंकत सहकार पॅनलने परिवर्तन पॅनलला पराभवाची धूळ चारली आहे. परिवर्तन पॅनलचा हा पराभव म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. पण बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. सहकार पॅनल हे गेल्या टर्ममध्येही निवडून आले होते. त्या टर्ममध्ये त्यांनी केलेल्या कार्याला पोचपावती मिळाली आहे. सहकार पॅनलमधले संचालक अनुभवी असून आगामी काळात ते बँकेला अधिक नावारूपाला नेतील असा विश्वास आमदार केळकर यांनी वक्त केला आहे.
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला ९ जागा मिळाल्या आहेत, तर भारतीय जनता पार्टीला ७ जागा मिळाल्या आहेत. तर यासोबतच अन्य २ जागा असे सहकार पॅनलचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, भाजपा आमदार संजय केळकर आणि आमदार किसान कथोरे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ठाणे महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना ठाण्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही मंत्र्यांना असा एकत्रित धक्का मिळणे हे नक्की कशाची नांदी आहे? अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे.