भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात ठाकरे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जीआर काढून वीजबिलांची थकबाकी वसूल करणाऱ्या सरकारच्या निषेधात ही अंत्ययात्रा काढली गेली.
कोरोनाच्या काळात राज्यातील वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तर ही वाढीव बिले न भरणाऱ्या थकबाकीधारकांची विजेची कनेक्शन सरकार मार्फत कापण्यात आली होती. त्यातच आता सरकार कडून नवीन अध्यदेश काढत थकबाकी त्वरेने भरावी अन्यथा विजेचे कनेक्शन कापण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या या काळ्या जीआरच्या विरोधात भाजपा आमदार संभाजी पाटील आक्रमक झाले असून त्यांनी सरकारची प्रेतयात्रा काढली आहे.
गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी निलंगा येथे ही अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत शेकडोच्या संख्येने शेतकरी आणि भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हलगी वाजवत ठाकरे सरकारची ही अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी स्वतः संभाजी पाटील हे तिरडीला खांदा देताना दिसले. तर तिरडीपुढे एक कार्यकर्ता मडके घेऊन चालत होता. या वेळी ठाकरे सरकारच्या निषेधाचे फलकही झळकावण्यात आले. संभाजी पाटील यांनी बुधवारीच ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारची अंत्ययात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते.
हे ही वाचा:
शेळी पालनाच्या बहाण्याने सुरू होता ड्रग्ज कारखाना
कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!
पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात
गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र
काय म्हणाले होते निलंगेकर?
“निझाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे. मात्र ठाकरे सरकार जणू काही त्यांचा विक्रम मोडू इच्छित असल्याप्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे. अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी. नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा फतवा जारी केला आहे. या सरकारच्या शेतकऱ्यांप्रति केवळ संवेदना मेलेल्या नाहीत तर हे राज्य सरकारच शेतकऱ्यांसाठी मेलेलं आहे.” असे म्हणत निलंगेकर यांनी १८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारची प्रेतयात्रा काढणार असल्याचे घोषित केले होते.