भाजप नेते नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्यावतीने राणेंचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तीस हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका झाली आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत.
नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आले होते. न्यायालायने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आज जामीन मंजूर केला आहे. अटी मध्ये दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आठवड्यातून एकदा तरी राणेंनी पोलीस ठाण्यात हजेरी लावायची आहे, असे नमूद केले आहे. तसेच दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास राणेंना बंदी घातली आहे. नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक राकेश परबलाही जमीन मंजूर झाला आहे. मात्र राणेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे जामीन मंजुरीवेळी ते तिथे उपस्थित नव्हते.
जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर राणेंना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने कोल्हापुरला त्यांना हलवण्यात आले होते. दरम्यान, मंत्री नारायण राणे दिल्लीतील संसदीय अधिवेशनातून थेट सिंधुदूर्गमध्ये दाखल झाले होते.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
‘हिजाब’ वादाचे कर्नाटकबाहेर पडसाद….भाजप – काँग्रेस आमनेसामने !
मलाला, कट्टरतावादी अजेंडा चालवते! भाजपा नेते कपिल मिश्रांचा निशाणा
संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते
काय आहे प्रकरण?
१८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची धागेदोरे आमदार नितेश राणे यांच्यापर्यंत गेले होते. त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.