“पवार साहेबांचे अदृश्य हात, अजित पवारांचे चोख नियोजन”

“पवार साहेबांचे अदृश्य हात, अजित पवारांचे चोख नियोजन”

डोर्लेवाडीतील घटनेवरून निलेश राणेंचा टोला

एकीकडे राज्यात अनेकठिकाणी कोविड लसीकरण मोहिमेचा खेळखंडोबा झालेला असतानाच बारामतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकांचे लसीकरण झालेले नसतानाही त्यांना लस घेतल्याचे मेसेजेस गेल्याची घटना घडली आहे. बारामतीतील डोर्लेवाडी या गावात हा प्रकार घडला आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी डोर्लेवाडीतल्या या घटनेवरून पवार कुटुंबाला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राणेंनी निशाणा साधला आहे. डोर्लेवाडीची बातमी ट्विटरवर शेअर करताना निलेश राणे यांनी “पवार साहेबांचे अदृश्य हात आणि पालकमंत्री अजित पवारांचं चोख नियोजन” असे म्हटले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयात शरद पवारांचा अदृश्य हात असल्याची टिप्पणी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावरूनच राणेंनी हा सणसणीत टोला लगावला आहे. निलेश राणे हे कायमच आपल्या आक्रमक ट्विट्समुळे चर्चेत असतात.

हे ही वाचा:

पुण्यात आणखी ‘कडक निर्बंध’

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. बारामतीतील डोर्लेवाडी गाव हे देखील कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. गावात कोरोनाने थैमान घातले आहे. या साऱ्या परिस्थितीवर लसीकरण हा उपाय आहे. पण डोर्लेवाडीच्या रहिवासीयांना त्यातूनही डोकेदुखी झाली आहे. लसीकरण झालेले नसतानाही गावकऱ्यांना लस घेतल्याचे मेसेजेस आले आणि त्यांच्या भुवया उंचावल्या. हा सगळा प्रकार कशामुळे घडला? यात नेमकी चूक कोणाची? हे अद्याप समोर आले नसले तरी यावरून राजकीय वार-पलटवार मात्र सुरु झाले आहेत.

Exit mobile version