आमदार भातखळकर यांनी खा. कोल्हे यांना सुनावले
देशाला नव्या संसद भवनाची गरज नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोविड सेंटरची जास्त गरज आहे, असे ज्ञानामृत पाजणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी कडक शब्दांत सुनावले आहे. हे तत्त्वज्ञान पाजळण्यापेक्षा सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्च करून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे ज्ञानामृत पाजा, असे तिखट ट्विट करून भातखळकर यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नव्या संसद भवनाची गरज नाही. त्याऐवजी हॉस्पिटले बांधा, असा अजब पवित्रा अनेक नेते घेत आहेत. खासदार कोल्हे यांनीही त्याचीच री ओढली. त्यावर भाजपा नेते भातखळकर यांनी त्यांचा योग्य भाषेत समाचार घेतला.
हे ही वाचा:
पोलिसांच्या मदतील धावला मुंबईतील उद्योजक
जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा
रिलायन्सकडून ७० हजार रुग्णांना मिळणार ऑक्सिजन
कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, देश भयानक परिस्थितीशी झुंजतो आहे, तेव्हा नव्या संसद भवनाची देशाला गरज नसून ऑक्सिजन प्लांट, कोविड सेंटरची जास्त गरज आहे. त्यावर भाजपा नेते भातखळकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी उभारले जात आहे. त्यासाठी ४०० कोटींचा निधी सरकारी तिजोरीतून वापरला जाणार आहे. तीच बाब आमदार भातखळकर यांनी कोल्हे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रथम मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात ही गोष्ट आणून द्या आणि मगच नव्या संसद भवनाबाबत बोला, असा सल्ला त्यांनी कोल्हे यांना दिला आहे.
आजही जे खासदार नव्या संसद भवनाबद्दल रडका सूर आळवत आहेत, तेच नवे संसद भवन बनल्यावर मात्र त्यात बसून लोकांचे प्रश्न मांडणार आहेत, तेव्हा ते या संसद भवनाला विरोध करतील का? या नव्या संसद भवनात ते प्रवेश करणार नाहीत का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सडेतोड उत्तर दिले.