‘योग्य वेळ आली की ठाकरे सरकारचा का करेक्ट कार्यक्रम करणार’ या आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
२ मे रोजी झालेल्या मतमोजणीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. दीड वर्षातल्या महाविकास आघाडीच्या भोंगळ, भ्रष्ट कारभाराला पंढरपूरच्या जनतेने आरसा दाखवला असे फडणवीसांनी म्हटले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासूनची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत सत्ता, पैसा, प्रशासन यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही. यावेळी फडणवीसांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचेही अभिनंदन केले. तर प्रशांत परिचारक,उमेश परिचारक हे राम लक्ष्मणासारखे आवताडे यांच्या सोबत राहिले असे म्हणत त्यांचे आणि इतर सर्व नेत्यांचे,कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा:
पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला
मोदींनी केले विरोधकांचे अभिनंदन
निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक
भाजपाच्या वनाथी यांनी दिली कमल हसनना धोबीपछाड
ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कोणालाच मदत केली नाही. बारा बलुतेदारांमध्ये सरकारविषयी नाराजी होती. अत्यंत चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वीज तोडली गेली त्याचीही नाराजी होती. या साऱ्याचे उत्तर जनतेने दिले आहे. विठ्ठलाने आम्हाला आशिर्वाद दिला आहे आणि हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो असे फडणवीस म्हणाले.
याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना त्यांच्या प्रचारातील भाषणाची आठवण करून देत करेक्ट कार्यक्रमाच्या वक्तव्याबद्दल विचारले. तेव्हा आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून योग्य वेळ आली की सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. पण हि वेळ योग्य नाही. आपण सारेच कोरोनाशी लढतो आहोत. याचा सामना आपल्याला एकत्र करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही देखील आमच्यापरीने सरकारला मदत करत आहोत असे फडणवीसांनी सांगितले.