भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. रविवार १२ डिसेंबर रोजी कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर परिसरात हा सोहळा पार पडेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. तर याचवेळी भाजपाचा मोठा कार्यकर्ता मेळावाही होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, उत्तर मुंबई मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी तसेच मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष माजी आमदार रमेश सिंह ठाकुर हे उपस्थित असणार आहेत.
हे ही वाचा:
तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?
… म्हणून ३०० मिनिटांसाठी एसबीआयच्या इंटरनेट सेवा राहणार बंद
बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार अतुल भातखळकर हे भाजपाचा एक अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली अनेक वर्ष भाजपासाठी पूर्णवेळ कार्यरत असताना विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भातखळकर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तर आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीतील त्यांचे कामकाज पाहून पक्षाने आणि जनतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. २०१९ ला जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. गेल्या दोन वर्षात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडली असून विकास कामांचा सपाटा लावला आहे.
रविवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्य अहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार असून कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर परिसरातील महिंद्रा यल्लो गेट समोर हा कार्यक्रम होणार आहे.