वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

गुरुवार, १७ जून रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मार्फत प्रदीप शर्मा यांना करण्यात आलेल्या अटकेवरून महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारला झोडपून काढले आहे. वाझेला शंभर कोटीचे टार्गेट दिले होते? प्रदीप शर्माला किती? असा सवाल त्यांनी केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. तब्बल ६ तासांच्या चौकशीनंतर शर्मा यांना अटक करण्यात आली. तर शर्मा यांचे घर, कार्यालय आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावरही एनआयएकडून झडती घेण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर शर्मा यांना २८ जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. पण यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

अखेर प्रदीप शर्मा अटकेत

भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

शर्मा हे महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे सदस्य असून त्यांनी २०१९ मध्ये शिवसेनेतर्फे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचे हेच शिवसेना कनेक्शन अधोरेखित करत भाजपाकडून टीका केली जात आहे. मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीदेखील शर्मा यांच्या शिवसेना कनेक्शनवर निशाणा साधला आहे. “मी शिवसेनेचा, शिवसेना माझी- इति प्रदीप शर्मा. कोणी बनवली होती, वाझे, शर्मा यांची वसूली सेना??? कोण आहे या टोळीचा प्रमुख?” असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

तर त्यापुढे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. “शांत, संयमी, विचारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री वाझेचा कार्यक्रम झाल्यानंतर शांत राहिले आता शर्माबाबत तरी तोंड उघडतील का? फेसबुक लाइव्ह केले तरी चालेल?” असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. तर पुढे जाऊन त्यांनी ‘प्रदीप शर्माला कितीचे टार्गेट होते?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

Exit mobile version