भारतीय जनता पार्टीतर्फे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेवरून चांगलेच राजकारण तापलेले दिसत आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पार्टीला नोटीस बजावली आहे. तर यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या विरोधात टोलेबाजी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या सर्व नव्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन तेथील जनतेचे आशीर्वाद मागावे असा कार्यक्रम भाजपाने आखला आहे. त्या अंतर्गतच या जन आशीर्वाद यात्रा देशभर सुरू आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतीच ज्यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतली आहे असे नारायण राणे हे देखील जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील जनतेशी संवाद साधत आहेत.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील राजकीय हत्यांचा तपास सीबीआय करणार
तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?
शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
पण ही यात्रा सुरू होण्या आधीच भारतीय जनता पार्टीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे कारण पुढे करत गर्दी करु नये असे सांगणारी ही नोटीस होती. तर नंतर शिवाजी पार्क परिसरातून नारायण राणे यांचे बॅनर्सही हटवले गेले.
यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जनतेची, राजकीय पक्षांची पोलिसांकरवी मुस्कटदाबी करण्याचा कुटील डाव महा खंडणी सरकार रचत आहे. यात्रेला प्रतिसाद मिळेल याची खात्री असल्याने ठाकरे सरकारला कापरे भरलेले दिसतेय’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
जनतेची, राजकीय पक्षांची पोलिसांकरवी मुस्कटदाबी करण्याचा कुटील डाव महा खंडणी सरकार रचत आहे. यात्रेला प्रतिसाद मिळेल याची खात्री असल्याने ठाकरे सरकारला कापरे भरलेले दिसतेय. pic.twitter.com/36uPuI9rkr— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 19, 2021
तर पुढे जाऊन गर्दी जमवत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून ‘गर्दी जमवण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्याना. या ‘शिवगर्दी’मुळे कोरोना पसरत नाही’ असे ट्विट करत ठाकरे सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे.
गर्दी जमवण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्याना. या 'शिवगर्दी'मुळे कोरोना पसरत नाही… pic.twitter.com/W44mAK4zWX
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 19, 2021