‘भाजपाचे सरकार खड्यासारखे दूर करा, हे चार खासदार असलेले पवारच सांगू शकतात’

‘भाजपाचे सरकार खड्यासारखे दूर करा, हे चार खासदार असलेले पवारच सांगू शकतात’

जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेल्या ३०३ खासदारांचे भाजपचे केंद्र सरकार खड्यासारखे दूर करा, हे ४ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगू शकतात ही भारतीय संसदीय लोकशाहीची खासियत आहे. तोंड दिलंय त्यामुळे काहीही बोला, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत भाजपाला खड्यासारखे दूर करा, असे वक्तव्य केले होते. त्यावर भातखळकरांनी रोखठोक मत व्यक्त केले.

त्याच सभेत पवारांनी हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार असा दावाही केला आहे. त्यावरही आमदार भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणतात की, ‘महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल असे शरद पवार म्हणत आहेत. महाविकास आघाडीचे भवितव्य जनतेने पंढरपूरला दाखवून दिले आहेच पण आता देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही.’

पवारांनी म्हटले होते की, दोन वर्षे झाली सरकार खंबीरपणे उभे आहे. आपला कार्यकाळ हे सरकार पूर्ण करील. यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच येईल.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यास राजी नव्हते पण आपण त्यांचा हात उंचावून मुख्यमंत्री बनण्याची सक्ती केली, असेही विधान शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथली पत्रकार परिषदेत केले होते.

Exit mobile version