महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गुरुवारी घेतला आहे. या निर्णयावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अवघे ठाकरे सरकार सतत मद्याच्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडुले झाली आहे’ असा जोरदार टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
राज्यात सुरु असलेला कोरोनाचा कहर बघता महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योग अडचणीत आलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय ठाकरे सरकारकडून क्वचितच घेतले जात आहेत. गुरुवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारने तत्परतेने चंद्रपूर मधील दारूबंदी हटवण्याचा निर्णय मात्र तत्परतेने ठाकरे सरकारने घेतला आहे.
हे ही वाचा:
चंद्रपूरच्या तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट, दारू बंदी उठवली
भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी
काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे गेल्या काही काळापासून चंद्रपूर मधील दारूबंदी हटवण्यासाठी भरपूर आग्रही होते. त्यासाठी वडेट्टीवार हे जोरदार प्रयत्न करत होते. दारूबंदी नंतर जिल्ह्यात अवैध दारूविक्री सुरु होती आणि दारूबंदी उठवावी यासाठी अडीच हजार निवेदने प्राप्त झाली होती असे सांगत वडेट्टीवार दारूबंदी उठवण्याचे जोरदार समर्थन करत होते. त्यांच्या या मागणीला ठाकरे सरकारने मंजुरी देत चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा चंद्रपूरमध्ये ‘झूम बराबर, झूम शराबी’ चे प्रयोग पाहायला मिळणार आहेत.
सरकारच्या या निर्णयावर टीका करताना अतुल भातखळकर यांनी एका दगडात अनेक पक्षांवर निशाणा साधला आहे. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे. अवघे ठाकरे सरकार सतत ‘मद्या’च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे.”
नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे.
अवघे ठाकरे सरकार सतत 'मद्या'च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे. @OfficeofUT pic.twitter.com/T1hVSI1rqD— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2021