ममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार

ममता बॅनर्जींविरोधात अतुल भातखळकर यांनी दाखल केली तक्रार

राष्ट्रगीताचा अवमान केल्याचे प्रकरण

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या केलेल्या अवमानाविरोधात दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा आणि त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, काल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोर सिझन हॉटेलमध्ये बैठक घेतली. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताला स्वतःच सुरुवात केली. प्रथम त्या बसूनच गात होत्या. नंतर त्यांना भान आले असावे म्हणून त्या उभ्या राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रगीत अर्धवटच संपविले. १९७१चा जो राष्ट्रगीताचा सन्मान कायदा आहे, त्या आधारे हे स्पष्ट होते की, त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. १९७१ च्या या कायद्यातील कलम ३ नुसार हा राष्ट्रगीताचा अपमान आणि देशाचा अपमान आहे. त्यामुळे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावरोधात एफआयआर दाखल करून त्यांना शिक्षा करावी, अशी मी मागणी केली आहे.

बुधवार, १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्या दरम्यान एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार, बुद्धिजीवी अशा लोकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा:

उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

पुढील काही तासात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाऊसाची हजेरी लागण्याची शक्यता

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

 

ममता बॅनर्जी यांचे मुंबईत बुधवारी एका कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमात छोटे भाषण केल्यावर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत अर्धवट गायले. ….पंजाब सिंधू गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग इथपर्यंत गाऊन त्यांनी जय भारत, जय मराठा, जय बंगाल अशी घोषणा देत कार्यक्रम संपविला.

Exit mobile version