संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा ऐतिहासिक विजय नोंदवताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी पराभूत झाले आहेत.
मतमोजणीच्या कलानुसार, भाजपा १८२ पैकी १५७ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १६, आप पाच आणि अपक्ष चार उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार हे चर्चेत होते. त्यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा आणि हार्दिक पटेल यांची चर्चा रंगली होती. रिवाबा जडेजा आणि हार्दिक पटेल या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. जामनगर उत्तरमधून रिवाबा जडेजा आणि विरामगाम विधानसभा मतदार संघातून हार्दिक पटेल विजयी झाले आहेत.
आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांचा मोठा प्रचार केला होता. तसेच घटलोडिया मतदार संघातून भूपेंद्र पटेल विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. घटलोडिया मतदार संघ ही गुजरातची व्हीआयपी सीट आहे. भाजपाने बनासकांठा मतदारसंघातून अनोखा विक्रम नोंदवला आहे. या ठिकाणी भाजपाने नऊ पैकी नऊ जागांवर विजय निश्चित केला आहे.
हे ही वाचा :
मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
दरम्यान, गुजरातमध्ये ११ किंवा १२ डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.