भाजप, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष आणि पवन कल्याण यांचा जन सेना पक्ष यांची युती आंध्र प्रदेशमध्ये २५ लोकसभा मतदारसंघांपैकी २१ जागांवर विजय मिळवतील, असा अंदाज इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडिया एग्झिट पोलने वर्तवला आहे. यामध्ये तेलुगु देसम पक्ष १३ ते १५, भाजप चार ते सहा जागा तर, जन सेना पक्ष दोन जागांवर विजय मिळवेल, असा अंदाज आहे.
या निवडणुकीत एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील व्हायएसआर काँग्रेसला अवघ्या दोन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघांमधील पाच लाख ८० हजार जणांच्या मुलाखतीवरून हा एग्झिट पोल घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड
बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का
एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन
तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजारीवाल हनुमानाच्या चरणी
आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी एकाच टप्प्यात सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. व्हायएसआर काँग्रेस पक्षाने सर्व २५ जागांवर उमेदवार उभे केले होते. एनडीएच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने १७, भाजपने सहा आणि पवन कल्याणच्या जन सेना पक्षाने दोन जागांवर उमेदवार उभे केले होते. तर, इंडिया गटातील काँग्रेसने २३ व माकप व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने प्रत्येकी एक जागा लढवली होती. बहुजन समाज पक्षाने राज्यातील सर्व २५ जागा लढवल्या होत्या.