मराठा आरक्षणामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता ओबीसींच्या रोषाचाही सामना करावा लागणार आहे. ओबीसींचा डाटा देत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण राहणार नाही. त्यामुळे ओबीसींना निवडणूक लढवण्यात अडचणी येणार आहेत. ठाकरे सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्यानेच ओबीसींवर ही वेळ आल्याचं सांगत सरकारच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षणासाठी ओबीसींचेही राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारला फैलावर घेतलं. “ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. राज्य सरकार ओबीसींचा डेटा देऊ शकलं नाही. त्यामुळे आरक्षण ठरवता येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याचाच अर्थ जोपर्यंत सरकार डेटा देत नाही तोपर्यंत आरक्षण ठरवता येणार नाही. १४ महिन्यांपासून सरकारला डाटा गोळा करण्यासाठी वेळ होता. परंतु सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचं काम केलं आहे. सरकार उदासीन आहे. त्यांनी आयोग स्थापन केलाच नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असून आता ओबीसींना आरक्षित जागेवर निवडणूकही लढवता येणार नाही,” असं बावनकुळे यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
पवार-दरेकर भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण
वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच
युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी
शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?
ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी सरकारला आता गाव पातळीवर डाटा तयार करावा लागेल. आम्ही आयोग नेमला आहे. डाटा गोळा करण्यासाठी थोडा वेळ द्या, असं कोर्टाला सांगता आलं असतं. पण सरकारने आयोगच नेमला नाही. त्यामुळे कोर्टाकडे वेळ कसा वाढवून मागणार? असा सवाल करतानाच या दुराचारी सरकारमुळेच ओबीसींवर संकट आलं असून आपलं पाप लपवण्यासाठी हे भाजपाच्या सरकारचं पाप असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत, असंही ते म्हणाले.