“…नाहीतर आम्ही ‘तांडव’ करू” – राम कदम

“…नाहीतर आम्ही ‘तांडव’ करू” – राम कदम

ॲमेझोन प्राईमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधील धर्मीक आणि जातीय भावना भडकावणाऱ्या दृश्यांविरोधात भारतीय जनता पार्टी अक्रमक झाली आहे. या वेबसीरिजचे कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात कडक कारवाई करा अन्यथा आम्ही तांडव करू असा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे.

ॲमेझोन प्राईमची नवी वेब सिरीज ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. घाटकोपरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी ‘तांडव’ विरोधात आंदोलन करून घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी ॲमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ ही राजकीय नाट्य असलेली वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, झिशान आयुब, सुनील ग्रोव्हर अशी स्टारकास्ट असलेल्या या सिरीजमध्ये धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये आणि जातीवाचक संवाद आहेत असा आक्षेप कदम यांनी घेतला आहे.


“तांडव सिरीज मधील एका दृश्यात हातात डमरू आणि त्रिशूळ घेऊन नट आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतो. ही वाणी हिंदू देवतांचा अपमान करणारी आहे. त्यासोबतच एका दृश्यात एका विशिष्ट जातिसमूहाला उद्देशून अपमानजनक भाष्य करण्यात आले आहे जे एट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा आहे आणि हा कंटेन्ट जाणीवपूर्वक सोशल मिडियावर पसरवला जात आहे जे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी ‘न्युज डंका’ शी बोलताना दिली. पोलिसांनीही हा कंटेन्ट प्रथमदर्शनी आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.


जावडेकरांनाही लिहिले पत्र
आमदार राम कदम यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही या संदर्भात पत्र लिहिले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टसाठीही चित्रपट परीक्षण महामंडळासारखी काहीतरी व्यवस्था असावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version