महाराष्ट्रात सोमवारी १८ जानेवारी २०२१ ला १३,८३३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी ३२६३ जागांवर यश मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे काही अपवाद वगळता राज्यात अनेक ठिकाणी भाजपाविरोधात उमेदवार देताना सत्ताधारी महाविकास आघाडीत जागा वाटप किंवा अंडरस्टँडीग झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हा झटका असल्याचे मानले जाते.
पंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हांवर निवडणुका होत नाहीत. परंतु सर्वच पक्ष त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवत असतात. त्यामुळे या निवडणुकांच्या निमित्ताने जोरदार शक्ती परीक्षण झाले आहे. सामनातून तिन्ही पक्षांना मिळून सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला असला तरी भाजपा हा निर्विवादपणे सर्वात मोठा पक्ष असल्याचे उघड झाले आहे.
महाविकास आघीडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असलेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत जवळपास सर्वच ठिकाणी भाजपा विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढले. १३,८३३ ग्रामपंचायतींपैकी ३२६३ ठिकाणी भाजपाला यश मिळाले आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २९९९ ठिकाणी यश मिळाले आहे. त्याचबरोबर शिवसेनेला २८०८ तर काँग्रेस पक्षाला २१५१ ठिकाणी यश मिळाले आहे. इतर पक्षांना २५१० ठिकाणी यश मिळाले आहे. विधानसभेप्रमाणेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष राहिला आहे. परंतु महाविकास आघाडीतील क्रमवारीत बदल झाला आहे. विधानसभेत ५६ जागांसह शिवसेना महाविकास आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागांसह दुसरा मोठा पक्ष आहे. पण ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मागे टाकत आघाडीतील सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले आहे.
राज्यातील सत्ता आणि एकत्रितपणे लढवलेली निवडणूक, अशी अनुकूल परिस्थिती असूनसुद्धा भाजपाच सगळ्यात मोठा पक्ष बनला हे महाविकास आघाडीचे अपयश म्हणावे लागेल. परंतु त्याचबरोबर भाजपालासुद्धा ५०% जागांच्या आसपास पोहोचता आले नाही हेही सत्य आहे. त्यामुळे तिघासोबत एक हाती मुकाबला करून सत्तेवर येण्यासाठी भाजपाला जोरदार कष्ट करावे लागणार आहेत. विधानसभेतसुद्धा सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले होते. त्यामुळे भाजपाला ५०% ची लढाई लढण्यावाचून पर्याय नाही असेच स्पष्ट होते.