पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद नागरी निवडणूकीसाठी तिकीट नाकारले आहे. पीटीआयने (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) निवडणुकांसाठी भाजपने गुरुवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. पण या यादीमध्ये सोनल मोदी यांचे नाव जाहीर केले गेले नाही.
सोनल यांना तिकीट नाकारण्याबाबत विचारले असता, प्रदेशाध्यक्ष भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील म्हणाले की, “नियम सर्वांसाठी समान असतात.” गुजरात भाजपने नुकतीच घोषणा केली की आगामी निवडणुकांसाठी तिकिट वाटपासाठी पक्षाच्या नेत्यांच्या नातेवाईकांचा विचार केला जाणार नाही.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सोनल मोदी यांनी एएमसीच्या बोडकदेव प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे तिकीट मागितल्याचे सांगितले होते. पीएम मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांची ही मुलगी आहे.
सोनल मोदींनी दावा केला आहे की त्यांनी पंतप्रधानांची पुतणी म्हणून नव्हे तर भाजप कार्यकर्ता म्हणून निवडणुकीचे तिकीट मागितले होते. सोनल मोदी यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी पंतप्रधानांची नातेवाईक म्हणून नाही तर भाजपा कार्यकर्ता म्हणून माझ्या क्षमतेसाठी तिकीट मागितले होते. मला तिकीट दिले गेले नाही तरी मी समर्पित कार्यकर्ता म्हणून पक्षात सक्रिय राहीन.”
काँग्रेससह सर्वच पक्षांमध्ये पक्षश्रेष्टींच्या कुटुंबातील लोकांना सहज उमेदवारी दिली जाते. परंतु भाजपाने थेट नरेंद्र मोदींच्याच कुटुंबातील व्यक्तीलाच तिकीट नाकारून एक वाखाणण्याजोगा पायंडा पाडला आहे.