संध्या दोशींवर गुन्हा दाखल करा! भाजपाची मागणी

संध्या दोशींवर गुन्हा दाखल करा! भाजपाची मागणी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती संध्या दोशी यांनी भगवती रूग्णालयात जाऊन राडा घातल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय जनता पार्टी संध्या दोशींविरोधात आक्रमक झाली आहे. संध्या दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपातर्फे केली जात आहे. मुंबई भाजपाचे सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी ही मागणी केली आहे.

देशभर उसळलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत आहे. राजधानी मुंबईसह राज्यभरात सगळीकडेच आरोग्य सुविधांवर प्रचंड मोठा ताण असून आहे त्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. अशातच आता महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीच थेट डॉक्टरांवरच दमदाटी करत असल्याचे आढळून आले आहे. शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका संध्या दोशी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात संध्या दोशी या मुंबईतील भगवती रुग्णालयात राडा घालताना दिसत आहेत. भगवती हॉस्पिटलमधील डॉक्टरवर आवाज चढवून दमदाटी करताना दिसत आहेत. संध्या दोशी यांचे नातेवाईक भगवती रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असा आग्रह धरत संध्या दोशींनी हा राडा घातला. दोशी यांच्या राड्यानंतर भगवती रुग्नालयातील तेरा डॉक्टर्सनी राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

या संपूर्ण प्रकरणात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. मुंबई भाजपाचे सचिव आणि मुंबई महापालिकेतील शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी या संबंधी मुंबई आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे संध्या दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. संध्या दोशी यांनी सामाजिक आपत्तीच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर्सना अश्लील, अर्वाच्च भाषेत दमदाटी केलीय. तसेच आपल्या पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. तसेच दोशी यांच्या सोबतच्या व्यक्तीने मास्कही घातला नव्हता. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रतिक कर्पे यांनी केली आहे. तर संध्या दोशी यांनी शिक्षण समिती सभापती पदाचाही राजीनामा द्यावा अशीही त्यांची मागणी आहे.

Exit mobile version