महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आता उलटी मोजणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, असा दावा करत त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. रात्री ही भेट झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात आता हालचाली अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले. ३० जूनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील असे दिसते आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपालांना ईमेलद्वारे आम्ही पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार आता महाराष्ट्राबाहेर आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना नको असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे ते बहुमत सरकारने सिद्ध करावं आणि तसे आदेश राज्यपाल महोदयांनी सरकारला द्यावेत. राज्यपाल यावर उचित निर्णय घेतील.
हे ही वाचा:
कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; १९ मृत्यू
आपल्या पुत्राने, प्रवक्त्याने अश्लाघ्य भाषा वापरायची आणि दुसरीकडे समेटाची भाषा, याचा अर्थ काय?
जे अडीच वर्षात घडले नाही, ते आता घडतंय…
माकडाला चिप्स देताना तो पडला दरीत!
२० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ११-१२ आमदार त्यांच्यासोबत आहेत असे म्हटले जात होते. नंतर हा आकडा वाढत गेला. आणखी काही आमदार, मंत्रीही त्या गटात सामील झाले.
आता शिवसेनेचे संख्याबळ कमी झालेले असताना बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करतील आणि एक दिवस निश्चित करून त्यादिवशी फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून बहुमत कुणापाशी आहे हे सिद्ध केले जाईल.