ठाणे शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे अर्थात एम्सचे (AIIMS) अद्ययावत हॉस्पिटल सुरु करण्यात यावे अशी मागणी ठाणे भाजपा मार्फत करण्यात आली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हे हॉस्पिटल सुरु करण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या मागणीचा नियम व धोरणांनुसार सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन राज्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिले.
भाजपाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पत्की यांचा समावेश होता.
हे ही वाचा:
तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?
बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत पोचली आहे. तर ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी ३५ लाखांपर्यंत गेली आहे. तर लगतच्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्याही ४० लाखांपर्यंत पोचली आहे. सद्यस्थितीत दोन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी हॉस्पिटल म्हणून ठाणे येथे केवळ डॉ. विठ्ठल सायन्ना सिव्हिल हॉस्पिटल अस्तित्वात आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांची हॉस्पिटले सक्षम नसल्यामुळे, सर्व ताण सिव्हिल हॉस्पिटलवरच येतो. सिव्हिल हॉस्पिटलची रुग्ण क्षमता केवळ ३०० आहे. त्यातच सद्यस्थितीत कोरोना विशेष रुग्णालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार सुरू असल्यामुळे अन्य आजारावरील रुग्णांना नाईलाजाने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यात अनेक वेळा सामान्यांना लाखोंची बिले आकारले गेल्याचे प्रकार घडले. अशा परिस्थितीत ठाण्यात अद्ययावत सरकारी हॉस्पिटलची गरज आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालघर व ठाणे जिल्ह्यातील हजारो गरीब व सामान्य परिस्थितीच्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलचाच आधार आहे. त्यामुळे तेथेच रुग्णांकडून धाव घेतली जाते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वच आजारांवर उपचार होत नसल्यामुळे, अनेक रुग्णांना मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल किंवा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते. काही वेळा चिंताजनक स्थितीतील रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, ठाणे शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) अद्ययावत हॉस्पिटलची आवश्यकता आहे. ते सुरू करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे.