महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्षांकडून या निवडणुकीच्या रिंगणात शिलेदार उतरवले जात असून शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा कडून पाच जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर,नागपूर, मुंबई, धुळे-नंदुरबार आणि अकोला-बुलढाणा-वाशीम या पाच जागांसाठी भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
कोल्हापूर मधून भाजपाने अमल महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या जागेसाठी महाडिक यांचे नाव चर्चेत होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक हा प्रतिष्ठेचा सामना होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे या निवडणुकीसाठी सतेज पाटील मैदानात उतरले असून पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबाचा संघर्ष पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा:
अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम
बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही
…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले
भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’
तर नागपूर मधून भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बावनकुळे हे महाराष्ट्रातील भाजपाचा एक महत्त्वाचा ओबीसी चेहरा मानले जातात. बावनकुळे देवेंद्र फडणीस यांच्या सरकारमध्ये ऊर्जा खात्याचे मंत्री होते. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. याचा फटका भाजपाला काही महत्त्वाच्या जागांवर बसल्याचे म्हटले जाते. त्यामुळे बावनकुळे यांना विधानपरिषदेवर पाठवून ओबीसी समाजाला पुन्हा आपल्या जवळ घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
धुळे-नंदुरबार मधून अमरीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशीम या ठिकाणाहून वसंत खंडेलवाल यांना मैदानात उतरवले आहेत मुंबई मधून भाजपाने राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.